सुमार क्षमता आणि मर्यादीत बकूब असलेले लोक जेव्हा संघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये महत्वाच्या पदावर असतात तेव्हा नेमकं काय होते त्याचा अनुभव सध्या भाजपाचा कार्यकर्ता घेतो आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना नोटीस पाठवण्यावरून सुरू झालेले रण शमते न शमते तोच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे विधीमंडळ अधिवेशना दरम्यान, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंड गोड करायला गेले. उद्धव ठाकरेसह शिवसेना उबाठाच्या आमदारांना त्यांनी चॉकलेट दिले. उद्धव ठाकरेंनीही त्यांना मविआच्या लोकसभेतील ३१ जागांवरील विजयाबद्दल दादांना पेढा दिला, त्यातला अर्धा पेढा देऊन त्यांनी आमदार अनिल परब यांचे पदवीधर मतदार संघातील विजयाबद्दल आगाऊ अभिनंदन केले. निकाल जाहीर व्हायची वाट पाहण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. या घटनेचा अर्थ स्पष्ट आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा काही एका दिवसात झालेला नाही. चंद्रकांत दादा यांच्यासारख्या लोकांनी त्याची पायाभरणी करण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले आहेत.