भारताच्या सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेले, त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कऱणारे अमेरीकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांना मावळते अध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केलेला आहे. अमेरीकेतील डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचे समर्थक यामुळे प्रचंड खवळलेले आहेत. ते बायडन आणि सोरोस या दोघांवर टीकेची झोड उठवतायत. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपानेही काँग्रेसला चिमटा काढला आहे. अमेरीकेतील डीप स्टेटला नेस्तनाबूत करणार अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकी दरम्यान केली होती, त्या डीप स्टेटचा एक प्रमुख मोहरा असलेल्या सोरोस यांना बायडन प्रशासनाने जाता जाता पुरस्काराचा शेंदूर फासला आहे. परंतु सोरोस त्यामुळे फारसे खुष नाहीत अशी चर्चा आहे.