‘अर्णब गेट’ची थुकरट थिअरी

बालाकोट एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान च्या सुरात सूर मिसळून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संशय घेणाऱ्या टोळक्याने आता व्हाट्सएप चॅटचा आधार घेत अर्णब गेट थिअरी मांडली आहे. अर्णब वर देशद्रोहाचा आरोप ठेवण्याची मागणी केली आहे. वाचा काय आहेत हे आक्षेप? आणि न्यूज डंकाचे सल्लागार संपादक अतुल भातखळकर यांनी या आक्षेपांची केलेली चिरफाड

अर्णबगेटवर अतुल भातखळकरांचे परखड

रिपब्लिक मीडीयाचे एडिटर इन चिफ अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सऍप चॅटवरून सध्या गदारोळ माजलेला आहे. हे चॅट सत्य की असत्य याबाबत अद्यापी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नसताना या विषयाचे विरोधकांनी भांडवल केलेले आहे. बालाकोट एअरस्ट्राईकच्या संदर्भात अर्णब यांना माहिती होती आणि त्यांनी ही गोपनीय माहिती व्हॉट्सऍप चॅटच्या दरम्यान उघड केली असा विरोधकांचा आरोप आहे आणि या आरोपाच्या आधारावर अर्णव गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. 

मुळात, विरोधकांच्या आक्षेपांप्रमाणे अर्णब गोस्वामींच्या उघड झालेल्या चॅटमध्ये बालाकोट, किंवा एअरस्ट्राईक अशा प्रकारचा कोणताही उल्लेख नाही, ना तारखेचा उल्लेख आहे, ना वेळेचा उल्लेख आहे. ते केवळ एवढे म्हणाले आहेत की, ‘कुछ बडा होगा|’ आणि ‘कुछ बडा होगा’ याबाबत देशभरातल्या मोदी समर्थकांमध्ये आणि राष्ट्रभक्तांमध्ये कोणतीही शंका नव्हती, कारण पाकिस्तानने पुलवामाचा हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जाहिर सभेत असं सांगितलेलं, की ‘आतंकवादी संघटना आणि त्यांचे पाठिराखे यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. खूप मोठी किंमत त्यांना चुकती करावी लागेल. मी संपूर्ण देशाला भरोसा देतो, की या हल्ल्याच्या मागे ज्यांचा हात आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्की शिक्षा केली जाईल.’ 

त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई होणार हे देशातल्या प्रत्येकाला माहिती होतं तर अर्णब गोस्वामीने याचाच उल्लेख केलेला आहे. यावरून फुकटचा गदारोळ माजवण्यापेक्षा विरोधकांनी आत्मपरिक्षण करायला हवं, की बालाकोट स्ट्राईक केला तेव्हा या स्ट्राईकचे पुरावे विरोधकांनी मागितले, पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून विरोधक त्यावेळी बोलत होते. हा हल्ला आतंकवाद्यांच्या अड्ड्यावर झालेला नसून एका शाळेवर झालेला आहे. अशा कोणत्यातरी बातमीचा हवाला देऊन मोदींवर प्रचंड टिका केली होती. पाकिस्तान आणि काँग्रेसचा सूर एकच होता. असे सर्व विरोधक आता अर्णब गोस्वामीेंच्या चॅटवरून पाकिस्तानची री ओढत आहेत. खरंतर चौकशी या लोकांची झाली पाहिजे, ज्यांनी बालाकोट स्ट्राईकचे पुरावे मागितले आणि बालाकोट स्ट्राईक वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पाकिस्तानच्या सुरात सूर मिळला, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. 

याच विरोधकांनी देशद्रोहाचा कायदा रद्द करावा अशी मागणी अलिकडेच केली होती. आता त्याच कायद्याचा वापर राष्ट्रवादाला शिरोधार्य मानून चॅनल चालवणाऱ्या अर्णब यांच्या विरोधात करण्याची विरोधकांची इच्छा आहे. विरोधकांची यामुद्द्यावर भूमिका सुरूवातीपासूनच दिशाभूल करणारी आणि दुटप्पीपणाची राहिली होती हे उघड होत आहे. 

या प्रकरणाची जर चौकशी झालीच तर ती एनआयएच्या मार्फत करावी, कारण या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्रापेक्षा मोठी आहे. ती राष्ट्रव्यापी आहे.

Exit mobile version