महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी महायुतीचे सरकार येईल. २०२९ मध्ये भाजपा स्बवळावर सत्ता स्थापन करेल’, असा विश्वास भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेला आहे. राजकारण हे कायम बेभरवशाचे असते. उद्या काय घडेल हे सांगता येत नाही. हे अमित शहा यांनाही हे माहीत आहे. तरीही त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पाच वर्षांनंतर काय होईल याचे भाकीत केले. हवेत गोळीबार करणे हा अमित शहा यांचा स्वभाव नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तरप्रदेशसह अनेक राज्यात भाजपाला जे प्रचंड विजय मिळवून दिले ते त्यांच्या उत्तम रणनीतीमुळे. त्यामुळे स्वबळाबाबत त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते नेमके कोणासाठी आहे. पक्षाचे नेते की महायुतीतील घटक पक्षांसाठी याबाबत आता चर्चा सुरू आहे.