भारतात ५००० मिनी पाकिस्तान तयार झाले आहेत असे खळबळजनक मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले आहे. ‘न्युज डंका’ ला दिलेल्या बेधडक मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
भारतात हिंदूंचे संरक्षण होणार नाही तर कोणाचे होणार? असा सवालही रणजीत सावरकर यांनी उपस्थित केला आहे. हिंदूंवर होणारे बहुतांश अत्याचार हे ते हिंदू आहेत म्हणूनच होतात. त्यामुळे हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. बॉलीवूडवरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. बॉलीवूड मधील ‘खाना’वळीचा आर्थिक बहिष्कार केला पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची एकाधिकारशाही आली त्यामुळे राष्ट्रवादी पत्रकारिता हा विषयच संपून गेला. पण आज राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित अशी पत्रकारिता ही काळाची गरज आहे. राष्ट्रवाद शब्द उच्चारल्यावर अनेकांनींची अशी भावना असते की हे खूप मोठे पाप आहे, पण राष्ट्रवादाचा आवाज बुलंद झाला पाहिजे आणि राष्ट्रवादाचा डंका सर्वत्र वाजला पाहिजे. त्यामुळे ‘न्युज डंका’ ची जबाबदारी खूप अधिक आहे असे म्हणत त्यांनी न्युज डंकाला शुभेच्छाही दिल्या.