२०२० मध्ये जम्मू काश्मीर मध्ये २२५ दहशतवाद्यांचा खात्मा!

२०२० मध्ये जम्मू काश्मीर मध्ये २२५ दहशतवाद्यांचा खात्मा!



२०२० या वर्षात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि नागरी हत्या यात घट झाली आहे. तर दुसरीकडे  सुरक्षा यंत्रणांनी १०० पेक्षा जास्त यशस्वी दहशतवाद विरोधी कारवाया करताना २२५ दहशतवाद्यांचा ‘एन्काऊंटर’ केला आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी  जम्मू काश्मीर पोलिसांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

“आम्ही १०० पेक्षा अधिक यशस्वी कारवाया केल्या. यापैकी ९० कारवाया काश्मीर मध्ये तर १३ कारवाया जम्मूमध्ये करण्यात आल्या. या हल्ल्यात एकूण २२५ दहशतवादी मारले गेले असुन २०७ दहशतवादी काश्मीरमध्ये  तर १८ दहशतवादी जम्मूमध्ये मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या ४७ ‘टॉप कमांडर्स’चा समावेश आहे.” असे सिंह यांनी सांगितले.

 “अतिरेक्यांचे जमिनीवरचे जाळे मोडीत काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दहशतवाद्यांसाठी संदेशवाहक म्हणून काम करणाऱ्या किंवा त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांवर ग्रेनेड फेकणाऱ्या ६३५ लोकांना अटक केली आहे. त्यापैकी ५६ जणांवर जनसुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

यासोबतच “२९९ दहशतवाद्यांना अटक झाली असून १२ दहशतवाद्यांनी आत्मार्पण केले आहे” असेही सिंह म्हणाले.

२०२० सालात पोलिसांनी ४२६ शास्त्रे, ९००० दारुगोळा जप्त केला आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना १६ पोलीस अधिकाऱ्यांना आणि ४४ जवानांना वीरमरण आले आहे. तर ३८ सामान्य नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची माहितीही सिंह यांनी दिली.
 

Exit mobile version