२०२१ च्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अस्सल भारतीय मातीतल्या चार खेळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, यात आपल्या मराठी मातीतला रांगडा खेळ मल्लखांबही असणार आहे. या व्यतिरिक्त पंजाबचा ‘गटका’ , केरळचा ‘कलारीपट्टू’ आणि मणिपूरच्या ‘थांग ता’ या खेळांचाही समावेश आहे. यावर्षी हरियाणामध्ये हे स्पर्धा भरवण्यात येणार आहे.
हे चारही खेळ साहसी खेळ आहेत. यातील गटका खेळात दोन स्पर्धकांमध्ये लाकडी काठीने द्वंद्व होते. तर केरळचा कलारीपट्टू ही एक प्राचीन भारतीय युद्धकला आहे, ज्याचे संदर्भ इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आढळतात. मणिपूरच्या थांग ता हा देखील भारतीय युद्धशास्त्राचाच एक प्रकार आहे. ह्यात तलवार, भाला आणि मुष्टियुद्ध या गोष्टींचा समावेश असतो. मल्लखांब खेळात ‘पोल मल्लखांब’ आणि ‘रोप मल्लखांब’ असे दोन प्रकार असतात. याच वर्षी भारत सरकारने मल्लखांब खेळाला सरकारी नोकरीतील क्रीडा कोट्यासाठी मान्यता दिली आहे.
“या खेळांसाठी ‘खेलो इंडिया’ हे योग्य व्यासपीठ आहे” अशी प्रतिक्रिया भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजीजु यांनी दिली आहे. भारतात खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने ‘खेलो इंडिया’ उपक्रमाची सुरुवात केली. २०१८ साली सुरु झालेल्या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.