भारताच्या महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार स्मृती मंधाना हिने सांगितले की, वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आता हळूहळू तसाच प्रभाव निर्माण करत आहे, जो २००८ पासून आयपीएलने पुरुष क्रिकेटवर केला होता.
स्मृती मंधाना म्हणाली,
“गेल्या तीन वर्षांत आम्ही पाहिलं की डब्ल्यूपीएल किती झपाट्याने पुढे गेलं आहे. पूर्वी स्टेडियममध्ये मुख्यतः मुलं येत असत, पण आता खूप साऱ्या मुलीही सामने पाहायला येतात. लहान मुली आमच्याजवळ येऊन सांगतात की, ‘आम्हालाही क्रिकेटर व्हायचंय’. हे ऐकून खूप आनंद होतो. डब्ल्यूपीएलने टी२० क्रिकेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि मनोरंजनाचं काम मोठ्या ताकदीने केलं आहे. जसं आयपीएलने पुरुष क्रिकेटसाठी गेल्या १७ वर्षांत केलं, तसंच डब्ल्यूपीएल महिला क्रिकेटसाठी करत आहे.”
डब्ल्यूपीएलची सुरुवात २०२३ मध्ये झाली, आणि त्यानंतर भारतातल्या लहान-मोठ्या शहरांमध्ये मुली मोठ्या संख्येने क्रिकेट अकॅडम्यांमध्ये दाखल होत आहेत. स्मृती मंधाना स्वतः सांगलीमध्ये एक अकॅडमी चालवते आणि आता दुबईमध्येही एक नवीन अकॅडमी सुरू करण्याच्या तयारीत आहे.
ती म्हणाली,
“फक्त जिथे डब्ल्यूपीएल संघ आहेत तिथूनच नव्हे, तर इतर शहरांतूनही मुलींची क्रिकेटसाठी आवड वाढताना दिसतेय. घरगुती क्रिकेटमध्येही मुली मेहनत करत आहेत, कारण त्यांनाही डब्ल्यूपीएल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं आहे. त्यामुळे चांगल्या सुविधा असलेल्या प्रशिक्षण केंद्रांची गरज आहे. आमची अकॅडमी सर्वांसाठी खुली असेल, पण आमचा विशेष फोकस महिला क्रिकेटच्या सर्वांगीण विकासावर असेल – केवळ कौशल्य नाही, तर मानसिक आणि शारीरिक तयारीवरही.”
पोषणविषयक जागरूकता हीदेखील आता महिला क्रिकेटमध्ये वाढली आहे, असं स्मृतीने स्पष्ट केलं.
ती म्हणाली,
“पूर्वी आम्हाला काय खावं, काय टाळावं हे माहितच नसायचं. अनेकदा जंक फूड खाल्लं जायचं. पण योग्य वयात योग्य माहिती मिळाली, तर त्याचा मोठा फायदा होतो. म्हणूनच आमच्या अकॅडमीत न्यूट्रिशन तज्ज्ञ असतील आणि ते मुलांना योग्य पोषणाचं मार्गदर्शन करतील. पोषण ही वैयक्तिक बाब असते, म्हणून आम्ही कोणावर दबाव आणणार नाही. पण माहिती पुरवू. एखादा १४-१५ वर्षांचा मुलगा/मुलगी असेल तर त्यांना त्यांची आवडती गोष्ट खाण्यापासून थांबवता येणार नाही. पण आम्हाला माहिती आहे की त्या वयात काय द्यावं आणि काय शिकवावं. त्यामुळे आम्ही एक योग्य योजना तयार करत आहोत. आम्ही एक स्पोर्ट्स न्यूट्रिशन एक्स्पर्ट आणि अनेक क्लिनिकची व्यवस्था करणार आहोत, जेथे पोषणाविषयी जागरूकता दिली जाईल.”
स्मृती आता २७ एप्रिल ते ११ मे दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या त्रिकोणी वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे, जिथे भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे तीन संघ सहभागी असतील.