आयपीएलच्या इतिहासात रचला “विराट” विक्रम

आयपीएलच्या इतिहासात रचला “विराट” विक्रम

“रन मशीन” म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो आहे. गुरुवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना जरी आरसीबीने गमावला असला, तरी कोहलीने आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला.

कोहली आयपीएलच्या इतिहासात १००० चौकार-षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
सर्व १८ आयपीएल हंगाम खेळलेला हा दिग्गज फलंदाज आरसीबीकडून आयपीएलच्या २४व्या सामन्यात हा विक्रम गाठण्यात यशस्वी ठरला.

हा विक्रम आरसीबीच्या डावातील चौथ्या षटकात आला, जेव्हा कोहलीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलच्या चेंडूवर लॉन्ग ऑनवर जबरदस्त षटकार ठोकला. यासह त्याने आयपीएलमधील एकूण १००१ चौकार-षटकारांचा टप्पा पार केला – ७२१ चौकार + २८० षटकार.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या यादीत कोहली अजूनही अव्वलस्थानी आहे. षटकारांच्या बाबतीत तो क्रिस गेल (३५७) आणि रोहित शर्मा (२८२) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पण कोहलीच्या ऐतिहासिक कामगिरीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं ते केएल राहुलच्या खेळीने.
राहुलने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ९३ धावा फटकावत दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीवर ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, दिल्लीची अवस्था एकवेळ ५८ धावांवर ४ बाद अशी बिकट होती, तरीही राहुलने संयम आणि आक्रमकतेचा समतोल राखत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.

हेही वाचा :

काँग्रेस आमदार विनेश फोगाटला चार कोटींसह भूखंडही हवाय!

जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्याला घातले कंठस्नान

‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!

तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी; चौकशीतून कोणते खुलासे होणार?

त्याआधी आरसीबीने फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या जोरदार सुरुवातीच्या जोरावर १६३ धावा केल्या होत्या. मात्र, दिल्लीच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या स्पिन जोडीने मधल्या षटकांमध्ये आरसीबीच्या धावगतीला लगाम घातला.

रन चेस दरम्यान राहुलला ट्रिस्टन स्टब्सची उत्तम साथ लाभली. स्टब्सने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३८ धावा करत राहुलसोबत ५व्या विकेटसाठी १११ धावांची विक्रमी भागीदारी रचली – जी दिल्लीच्या इतिहासातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. राहुलच्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

दिल्लीने १७.५ षटकांत १३ चेंडू राखून विजय साजरा केला.

Exit mobile version