खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा

खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा

भारताचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रा याने आपल्या विरोधात प्रसारित होत असलेल्या “खोट्या” आणि “संबंध नसलेल्या” बातम्यांचा तीव्र निषेध केला आहे. काही मीडियामध्ये असे वृत्त झळकले होते की मिश्रा याच्यावर त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीसंबंधी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिश्रा यांच्या पत्नीने १ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करत तक्रार दाखल केली असून, लग्नावेळी १० लाख रुपये आणि कारची मागणी केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबावर केला आहे.

या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ४२ वर्षीय मिश्रा यांनी या सगळ्या दाव्यांना फेटाळलं असून, त्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

“माझा फोटो चुकीच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. ही बातमी माझ्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. जर अशा असंबंधित बातम्यांमध्ये माझी प्रतिमा वापरणं थांबवलं नाही, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबेन,” असं मिश्रा यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं.

अमित मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीत भारतासाठी २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी२० सामने खेळले असून, अनुक्रमे ७६, ६४ आणि १६ बळी घेतले आहेत. त्यांनी चार अर्धशतकांसह कसोटी क्रिकेटमध्ये काही ठळक कामगिरी केली आहे.

त्यांनी आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स अशा चार फ्रँचायझींसाठी १६२ सामने खेळले असून १७४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट ७.३७ इतका आहे.

त्यांनी शेवटचा सामना IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता, ज्यात त्यांनी २ ओव्हरमध्ये १-२० असा प्रभावी माफक कामगिरी केली होती.

Exit mobile version