IPL 2025 आयपीएलच्या १८ व्या हंगामात, राजस्थान रॉयल्सने शानदार कामगिरी केली आणि शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांच्या घरच्या मैदान मुल्लानपूरवर पंजाब किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. या सीझनमधला पंजाबचा हा पहिलाच पराभव होता, तर राजस्थानने जोरदार पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याची सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २०५ धावा केल्या. यशस्वी जयस्वालने ६७ धावांची (४५ चेंडू, ३ चौकार, ५ षटकार) तुफानी खेळी केली, तर संजू सॅमसनने ३८ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये, रियान पराग (नाबाद ४३) आणि ध्रुव जुरेल (१३) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
प्रत्युत्तरादाखल, पंजाब संघ फलंदाजीसाठी आला आणि दबावाखाली दिसत होता. पहिल्याच षटकात, जोफ्रा आर्चरने प्रियांस आर्यला बाद करून सुरुवातीचा धक्का दिला. पुढच्याच षटकात श्रेयस अय्यरही आर्चरच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर, फलंदाज रांगेत बाद होऊ लागले. प्रभसिमरन सिंग आणि मार्कस स्टोइनिसही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. नेहल वधेरा (६२) आणि ग्लेन मॅक्सवेल (३०) यांनी ८८ धावांची भागीदारी करून सामन्याला चालना दिली असली तरी, १५ व्या षटकात हे दोघे बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव कोसळला. संपूर्ण संघ २० षटकांत फक्त १५५ धावाच करू शकला.
राजस्थानकडून आर्चरने तीन, संदीप शर्मा आणि मथिशा थीकशनाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हसरंगा आणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
कर्णधार सॅमसनच्या नावावर विक्रम
आजच्या विजयानंतर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून संजू सॅमसनने इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम त्याने दिग्गज ‘दिवंगत’ शेन वॉर्नला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन आयकॉनने ५५ सामन्यांमध्ये ३१ विजय नोंदवले होते, परंतु आज पंजाबच्या विजयानंतर, हा विक्रम आता संजू सॅमसनच्या नावावर आहे. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानने ६२ पैकी ३२ सामने जिंकले आहेत.