जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हे ठिकाण श्रीनगरपासून सुमारे ३० मैल अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळी आहे. या हृदयद्रावक घटनेचा देश-विदेशातून तीव्र निषेध केला जात आहे. भारतातील अनेक नामांकित खेळाडूंनी देखील या हल्ल्यावर तीव्र दुःख व्यक्त करत देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले,
“पहलगाममध्ये निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्याने मी हादरलो आहे आणि खूपच दुःखी आहे. पीडित कुटुंबियांची वेदना अकल्पनीय आहे. या कठीण प्रसंगी भारत आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत उभे आहे. आम्ही जीवितहानीवर शोक व्यक्त करतो आणि न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करतो.”
विराट कोहली यांनी लिहिले,
“पहलगाममध्ये निरपराधांवर झालेला हा क्रूर हल्ला पाहून मन अत्यंत दुःखी झाले आहे. पीडित कुटुंबियांच्या प्रती माझ्या मनापासून संवेदना. या अमानवी कृत्याला न्याय मिळावा आणि मृतांच्या कुटुंबियांना शांतता व बळ मिळो, अशी मी प्रार्थना करतो.”
हॉकीपटू पी. आर. श्रीजेश यांनी ‘एक्स’वर म्हटले,
“फक्त निषेध करून चालणार नाही, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. दहशत कधीही जिंकू शकत नाही. आम्ही पीडितांसाठी प्रार्थना करतो.”
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी लिहिले,
“हा दहशतवादी हल्ला अतिशय मन सुन्न करणारा आहे. माझे विचार पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. द्वेष आणि हिंसाचाराविरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. आपल्या जगात दहशतीला काहीही स्थान नाही आणि आपण कोणत्याही परिस्थितीत माणुसकीच्या बाजूनेच उभं राहायला हवं.”
माजी फलंदाज मोहम्मद कैफ म्हणाले,
“काश्मीर एक अत्यंत सुंदर प्रदेश आहे, जिथे क्रिकेटमुळे मला अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली. तिथे पर्यटकांच्या हत्येची बातमी ऐकून मन हेलावलं. भारताला अस्थिर करण्याचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत.”
जसप्रीत बुमराह म्हणाले,
“पहलगाममधील या घटनेने मन अत्यंत दुःखी आणि अस्वस्थ झालं आहे. सर्व पीडितांसाठी माझ्या प्रार्थना.”
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले,
“मृतांच्या कुटुंबीयांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. या भ्याड हल्ल्याचे दोषी याचा पूर्ण हिशोब देतील. भारत उत्तर देईल.”
माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग म्हणाले,
“पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने खूप दुःख झालं आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, हीच प्रार्थना. आपल्याला मानवता आणि एकतेच्या बाजूने खंबीरपणे उभं राहावं लागेल.”
माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाले,
“जेव्हा जेव्हा एखाद्या निरपराधाचं प्राण जातं, तेव्हा माणुसकी हरते. काही दिवसांपूर्वीच मी काश्मीरमध्ये होतो, त्यामुळे हा दु:खाचा प्रसंग अधिक जवळचा वाटतो.”