आयपीएलमधील एक नाट्यमय क्षण! अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांनी थेट चौथ्या पंचाशी वाद घातला… आणि याची किंमत त्यांना चुकवावी लागली – थेट सामना फीच्या २५% रक्कमेचा दंड आणि एक डिमेरिट पॉईंट!
आयपीएलने अधिकृत निवेदनात सांगितलं – “मुनाफ पटेल यांनी लेव्हल १ – अनुच्छेद २.२० अंतर्गत, खेळाच्या आत्म्याविरुद्ध वर्तन केल्याचं मान्य केलं असून, मॅच रेफरीच्या निर्णयाला ते सहमती दर्शवतात.”
आणखी स्पष्टपणे सांगायचं झालं, तर लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
ही घटना दिल्लीच्या गोलंदाजीदरम्यान घडली. बातमी अशी आहे की, मुनाफ पटेल यांचं एक संदेश दिल्लीच्या एका राखीव खेळाडूमार्फत मैदानात पाठवलं जाणार होतं. पण चौथ्या पंचाने तो खेळाडू मैदानात जाण्यापासून रोखलं… आणि मग सुरु झाला वाद! मुनाफ पटेल सीमारेषेवर बसून आपल्या शूजचे फीते बांधत असताना पंचाशी शाब्दिक चकमक झाली – आणि हे संपूर्ण प्रकरण व्हायरल झालं!
पण या गोंधळाच्या सावलीतही दिल्ली कॅपिटल्सने कमालीचा सामना खेळला! मिशेल स्टार्कने शेवटच्या षटकात जादू केली – हेटमायर आणि ध्रुव जुरेलला रोखून सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. तिथेही स्टार्कची चमक कायम राहिली – राजस्थानला फक्त ११ धावांवर रोखलं!
केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ती धावसंख्या सहज पार करत दिल्लीला या हंगामातील पहिली घरच्या मैदानावरची विजयी भेट दिली.
स्टार्कला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आलं – ४ षटकांत ३६ धावा आणि दोन धावबाद! खऱ्या अर्थानं ‘स्टार’!
या विजयानं दिल्लीला सहा सामन्यांतून १० गुण मिळवून अव्वल स्थानी पोहोचवलंय. पुढचा थरार शनिवार, अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, जेव्हा दिल्ली भिडणार आहे गुजरात टायटन्सशी!