भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सकडून लखनऊ सुपर जायंट्सवर मिळालेल्या आठ गडींच्या विजयानंतर राहुलने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
राहुलने अवघ्या १३० डावांमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आणि डेव्हिड वॉर्नर (१३५), विराट कोहली (१५७), एबी डिव्हिलियर्स (१६१) आणि शिखर धवन (१६८) यांना मागे टाकले.
२०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून कर्णधार म्हणून खेळलेला राहुल यंदा दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळतो आहे. गेल्या वर्षी फ्रँचायझीशी झालेल्या मतभेदानंतर लखनऊने त्याला रिलीज केले होते.
लखनऊविरुद्धच्या सामन्यात राहुलने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावा करत शानदार खेळी केली. एडन मारक्रम, दिग्वेश राठी आणि रवि बिश्नोई यांच्या फिरकीचा संयमाने सामना करत राहुलने गरजेच्या क्षणी आक्रमक फटकेही खेळले.
त्याने ४० चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. अष्टपैलू अक्षर पटेलसोबत भागीदारी करत राहुलने लखनऊच्या गोलंदाजांना सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. अखेर प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून सामना दिल्लीच्या नावावर केला.
राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्यांनी सर्वात जलद २०० आयपीएल षटकार मारणारा भारतीय म्हणूनही विक्रम केला आहे. ह्या यादीत फक्त क्रिस गेल आणि आंद्रे रसेल हेच राहुलच्या पुढे आहेत.
दिल्लीकडून खेळताना राहुलचा यंदाचा स्ट्राईक रेट १५५.६७ आहे – जो त्याच्या १२ आयपीएल हंगामांतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. आतापर्यंत ८ डावांमध्ये ३५९ धावा करून त्यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांची सर्वोत्तम खेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धची नाबाद ९३ धावांची खेळी होती.
वैयक्तिक कारणांमुळे राहुलने या मोसमात दिल्लीकडून पहिला सामना खेळला नव्हता.