IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय नोंदवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा ८ विकेट्सने पराभव केला. ११७ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबईने रायन रिकेल्टनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

IPL 2025 च्या 12व्या मॅच मध्ये कोलकाताने दिलेल्या ११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेलटन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. १३ धावा काढल्यानंतर रोहितला आंद्रे रसेलने बाद केले.
त्यानंतर विल जॅक्स आणि रिकेल्टन यांनी ४५ धावा जोडून संघाला मजबूत स्थितीत आणले. १६ धावा काढल्यानंतर जॅक रसेलचा दुसरा बळी ठरला. नंतर, सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत ९ चेंडूत २७ धावा (३ चौकार, २ षटकार) केल्या आणि मुंबईला सहज विजय मिळवून दिला.
त्याआधी, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केकेआरला फक्त ११६ धावांत गुंडाळले. पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमार आणि अनुभवी दीपक चहर यांनी वेगवान गोलंदाजी केली.
मुंबईच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. पॉवर प्लेमध्येच केकेआरचे टॉप ४ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण संघ १७ षटकांत ११६ धावांवर बाद झाला. अश्विनी कुमारने ४ विकेट्स घेत शानदार पदार्पण केले.
कोलकाताकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक २६ धावा केल्या. याशिवाय रमनदीप सिंगने २२ धावा, मनीष पांडेने १९ धावा आणि रिंकू सिंगने १७ धावांचे योगदान दिले.