लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठीला मंगळवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात पंजाब किंग्जच्या सलामीवीर प्रियांश आर्यला जोरदार सेंड-ऑफ दिल्याबद्दल फटकारण्यात आले आहे.
बीसीसीआयने आयपीएल आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी लखनौच्या गोलंदाजाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली. दिग्वेशवर सामन्याच्या फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आणि पंजाबच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर त्यांच्या उत्स्फूर्त “नोटबुक सेलिब्रेशन” साठी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे, “लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश सिंहवर मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध त्यांच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामन्याच्या फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला असून, एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.”
हे ही वाचा:
पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!
२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!
मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!
काँग्रेस काळात समिती फक्त शिक्का मारायची
ही घटना पंजाबच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. जेव्हा दिग्वेशच्या चेंडूवर प्रियांश शॉट खेळण्यात अपयशी ठरला आणि चेंडू हवेत उंच गेला. शार्दुल ठाकुरने मिड-ऑनवरून पुढे जात सोपा झेल टिपला आणि लखनौला पहिला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर, राठी तात्काळ फलंदाजाच्या दिशेने धावत गेला आणि अशा पद्धतीने इशारा केला जणू काही त्याच्या “बाद झालेल्यांच्या यादीत प्रियांशचे नाव नोंदवले आहे”. त्यानंतर मैदानी पंचांनी त्याला त्वरित बोलावले आणि काही वेळ चर्चा केली.
पुढे निवेदनात म्हटले आहे, “दिग्वेशने अनुच्छेद २.५ अंतर्गत लेव्हल १ चूक केल्याची कबुली दिली आणि मॅच रेफ्रीच्या शिक्षेला मान्यता दिली. आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.”
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, लखनौला घरच्या मैदानावर १७१/७ धावांवर रोखण्यात पंजाबच्या गोलंदाजांनी यश मिळवले. त्यानंतर, पंजाबने प्रभावी फलंदाजी करत सहज लक्ष्याचा पाठलाग केला. प्लेयर ऑफ द मॅच प्रभसिमरन सिंग (३४ चेंडूंत ६९ धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (३० चेंडूंत नाबाद ५२ धावा) आणि नेहाल वढेरा (२५ चेंडूंत नाबाद ४३ धावा) यांनी २२ चेंडू शिल्लक असताना पाहुण्या संघाला सहज विजय मिळवून दिला.