मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा कधीही हार मानत नाही, अशी स्तुती भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी केली आहे. IPL 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलग दोन सामने जिंकत पुनरागमनाची नोंद केली असून, या यशामागे हार्दिकची आक्रमक आणि प्रेरणादायी नेतृत्वशैली महत्त्वाची ठरली असल्याचे जडेजा म्हणाले.
पुण्याहून सुरु झालेली ही झुंज आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांवर मात करत मुंबई इंडियन्सने स्पर्धेत नव्याने दमदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, हार्दिक पांड्याने आतापर्यंत 6 सामन्यांत 11 बळी घेतले असून, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच यादीत कुलदीप यादव, खलील अहमद आणि शार्दुल ठाकूर यांचीही नावे आहेत.
जडेजा यांनी जिओ सिनेमा वाहिनीवर बोलताना सांगितले,
“हार्दिक पांड्या ही एक वेगळीच व्यक्तिरेखा आहे. फलंदाजी, गोलंदाजी, फील्डिंग, मैदानावरील किंवा बाहेरील वातावरण… तो प्रत्येक आघाडीवर टीमचं नेतृत्व करताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं, आणि हार त्याच्या शब्दकोशात नाही.“
त्यांनी पुढे सांगितले की, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना हा खरा टर्निंग पॉइंट ठरला.
“हा सामना जवळजवळ हातून निसटलेला होता. बहुतांश संघ अशा प्रसंगी हार मानतात. पण हार्दिक आणि मुंबई इंडियन्सने जिद्दीने सामना जिंकला. तेच त्यांचं खरे व्यक्तिमत्व आहे.“
सध्या IPL 2025 च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर असून, पुढील महत्त्वाचा सामना वानखेडे स्टेडियमवर रविवारी एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे.