भारताचे माजी फलंदाज अंबाती रायडू यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या ९० धावांच्या अफलातून खेळीचं विशेष कौतुक केलं आहे.
सोमवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात गिलने ५५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी करत गुजरातला १९८/३ चा मजबूत स्कोअर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीमुळे गुजरातने केकेआरवर ३९ धावांनी विजय मिळवला.
गिलने बी. साई सुदर्शनसोबत ११४ धावांची ओपनिंग भागीदारी केली. सुदर्शनने ३६ चेंडूंमध्ये ५२ धावा फटकावल्या, ज्यामुळे जोस बटलरसाठी मजबूत मंच तयार झाला. बटलरने २३ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ४१ धावा केल्या. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खानने प्रत्येकी २ गडी बाद करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
हॉटस्टारवरील विश्लेषणात रायडू म्हणाले की, “गिलने अडचणीच्या खेळपट्टीवर अतिशय समजूतदार फलंदाजी केली. हर्षित राणाच्या २ वाइड चेंडूंनंतर त्याने गती पकडली. विशेषतः सुनील नरेनविरुद्ध खेळलेला स्लॉग स्वीप हा सहजासहजी कोणीही खेळू शकत नाही. गिलने सर्व दिशांनी फटके खेळले, जमिनीवरचे शॉट्स निवडले आणि प्रत्येक गोष्ट समजूनच केली. ही खेळी त्याच्या कौशल्याचं आणि चतुराईचं उदाहरण आहे.”
हेही वाचा :
“राशिद-प्रसिद्धचा कमाल, गुजरातचा केकेआरवर दणदणीत विजय!”
बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत
दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबूच्या मागे ईडीचे बाबू!
t
रायडूंनी साई सुदर्शनचंही विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, “सुदर्शनची पारंपरिक शैली डोळ्यांना सुखावणारी आहे. तो चेंडूच्या वेगाचा उपयोग करतो, योग्य शॉट्स निवडतो आणि जबाबदारीने फलंदाजी करतो. त्याची ही खेळी संपूर्ण संघात आत्मविश्वास निर्माण करते. त्याची निर्णय क्षमता आणि खेळातील समज यंदाच्या हंगामात उजळून आली आहे.”
केकेआर आता शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध खेळेल, तर गुजरात टायटन्स २८ एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सशी सामना करेल.