चेन्नई सुपर किंग्जच्या संघात एक धक्कादायक बदल! कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे आता मुंबईचा १७ वर्षीय दमदार सलामीवीर आयुष म्हात्रे सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत झळकणार आहे. त्याला त्याच्या बेस प्राईसप्रमाणे ३० लाख रुपये मिळणार आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे – आयुषने अजून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणही केलेलं नाही! पण त्याच्या बॅटमधून दोन फर्स्ट क्लास आणि दोन लिस्ट-A शतकं फुललीत. वरून ऑफ-स्पिन गोलंदाजीसुद्धा – चार लिस्ट-A इनिंगमध्ये घेतलेत तब्बल ७ बळी!
सीएसकेचे गोलंदाजी सल्लागार एरिक सिमन्स म्हणाले,
“आयुष ट्रायलसाठी चेन्नईला आला होता. नेट्समध्ये त्याचं खेळणं बघून सगळे भारावून गेले. अशा धाडसी तरुण खेळाडूंचं क्रिकेट पाहणं म्हणजे आनंद आहे. सीएसकेसुद्धा अशीच निडर क्रिकेट खेळते आणि खेळाडूंना मोकळेपणाने खेळू देते. आम्ही खूप उत्साही आहोत त्याला संघात घेऊन!”
आयुष म्हात्रेने नुकताच एशिया कप २०२४ मध्ये भारताच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवलं होतं. त्यानंतर तो थेट ईरानी कपसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघात निवडला गेला. तिथूनच त्याचं नाव प्रकाशझोतात आलं.
दरम्यान, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्टार लेगस्पिनर अॅडम झॅम्पा दुखापतीमुळे आयपीएल २०२५ बाहेर झाला असून, सनरायझर्स हैदराबादने (SRH) त्याच्या जागी कर्नाटकचा २१ वर्षीय फलंदाज आर स्मरणला ३० लाख रुपयांत घेतलं आहे.
स्मरणनं विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये फाडून टाकलं – ७ डावांत ७२ च्या सरासरीने ४३३ धावा आणि स्ट्राइक रेट १०० पेक्षा अधिक! फायनलमध्ये १०१ धावांची विजयी खेळीही खेळली. टी२० मध्येसुद्धा १७० च्या स्ट्राइक रेटने १७० धावा – भन्नाट फॉर्म!