सनरायझर्स हैदराबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या शतकाच्या खास सेलिब्रेशनबाबत एक अनोखा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की हे काही आधीपासून ठरवलेलं नव्हतं, पण त्या दिवशी सकाळी उठून त्याने एक विचार कागदावर लिहिला होता – “हे ऑरेंज आर्मीसाठी आहे.”
२४ वर्षांचा अभिषेक अवघ्या ५५ चेंडूंमध्ये १४१ धावांची वादळी खेळी करत आयपीएलच्या इतिहासातील भारतीय फलंदाजांचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम के.एल. राहुलकडे होता. हे आयपीएल इतिहासातील एकूण तिसरं सर्वात मोठं वैयक्तिक स्कोअर ठरलं.
शतक पूर्ण केल्यावर अभिषेकने आपला बॅट वर केली आणि खिशातून एक नोट काढली. त्यावर लिहिलं होतं – “हे ऑरेंज आर्मीसाठी आहे!”
मॅचनंतर पत्रकार परिषदेत, त्याच्या या खास सेलिब्रेशनबद्दल विचारल्यावर तो म्हणाला,
“मी सकाळी उठलो आणि सहज काहीतरी लिहिलं. विचार आला की आज काही विशेष केलं तर हे फक्त आणि फक्त आमच्या ऑरेंज आर्मीसाठी असेल. आणि नशिबानं, तोच माझा दिवस ठरला.”
गेल्या ५ सामन्यांमध्ये २४, ६, १, २ आणि १८ अशा निराशाजनक स्कोअरनंतर तो प्रचंड दबावात होता.
“हो, दबाव होता. ३-४ इनिंग्स खराब गेल्यावर आणि संघ हारत असेल, तर प्रेशर येतोच. पण संघात एकही खेळाडू नकारात्मक वाटत नव्हता. सगळ्यांकडून फक्त पॉझिटिव्ह एनर्जी होती,” असं त्याने स्पष्ट केलं.
इतकंच नाही, तर त्याने सांगितलं की त्या पाच दिवसांच्या ब्रेकमध्ये तो आजारी होता. तब्येत ४ दिवस खराब होती, ताप होता.
“पण युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू मला सतत कॉल करत होते, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता. आणि जेव्हा अशा व्यक्तींचा विश्वास असतो, तेव्हा तुम्हालाही पुन्हा स्वतःवर विश्वास वाटायला लागतो.”
अभिषेकने या सामन्यात १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले – जे SRH चा आतापर्यंतचा सर्वात जलद फिफ्टी ठरला. त्याने ट्रॅव्हिस हेडसह १७१ धावांची ओपनिंग भागीदारी केली आणि २४६ धावांचा पाठलाग केवळ ९ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केला – जो आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन चेसपैकी एक ठरला.
“मी आणि ट्रॅव्हिस फक्त एकमेकांकडे पाहून हसत होतो. आमच्यात फारसं बोलणं नव्हतं. आम्ही फक्त बॉल पाहत होतो आणि आपला गेम खेळत होतो. कारण जेव्हा आम्ही जोडीने खेळतो, तेव्हा संघ जिंकतो – हे आम्हाला ठाऊक आहे,” असं अभिषेकने आपल्या भागीदारीविषयी सांगितलं.