लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची एंट्री निश्चित झाली आहे! टी-२० फॉरमॅटमध्ये हे स्पर्धा खेळवण्यात येणार असून पुरुष आणि महिला या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा असतील. या स्पर्धांमध्ये प्रत्येकी ६ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने बुधवारी एलए २०२८ साठीच्या खेळांच्या यादीसह खेळाडूंची संख्या अधिकृतपणे मंजूर केली.
आयोजकांच्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी ९०-९० खेळाडूंचं कोटा निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला १५ खेळाडूंनी बनलेली टीम तयार करण्याची मुभा मिळणार आहे.
तथापि, क्रिकेटच्या स्पर्धा एलए २०२८ मध्ये कुठे खेळवल्या जातील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
क्रिकेट हा एलए २०२८ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ५ नव्या खेळांपैकी एक आहे. २ वर्षांपूर्वी, IOC ने बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (सिक्स), स्क्वॅश आणि क्रिकेट यांचा समावेश मान्य केला होता.
मुंबईत झालेल्या १४१व्या IOC सत्रात या सर्व खेळांना अधिकृत मान्यता मिळाली. क्रिकेट याआधीच कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये स्थान मिळवून आहे.
टी-२० फॉरमॅटमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धा २०१०, २०१४ आणि २०२३ या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळल्या गेल्या आहेत.
२०२२ मध्ये बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण ८ संघ सहभागी झाले होते. तर हाँगझो आशियाई स्पर्धांमध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धेत १४ संघांनी आणि महिला स्पर्धेत ९ संघांनी सहभाग नोंदवला होता.
मार्च २०२५ मध्ये IOC सत्रात बॉक्सिंगचा समावेश झाल्यामुळे एलए २०२८ मध्ये एकूण ३१ अधिकृत खेळ असतील. आयोजक समितीने सुचवलेल्या ५ नव्या खेळांनाही मान्यता मिळाली आहे – बेसबॉल/सॉफ्टबॉल, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश.
एलए २०२८ मध्ये एकूण ३५१ पदक स्पर्धा असतील, ज्या पॅरिस २०२४ च्या ३२९ स्पर्धांपेक्षा २२ अधिक आहेत. तरीही एकूण खेळाडूंची संख्या १०,५०० इतकीच ठेवण्यात आली आहे. यातील ६९८ कोटा स्थान हे वरील पाच नव्या खेळांसाठी राखीव आहेत.
या एकूण खेळाडूंमध्ये ५,३३३ महिला आणि ५,१६७ पुरुषांचा समावेश असेल. नव्या खेळांमध्ये ३२२ महिला आणि ३७६ पुरुष खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय ६ मिश्र प्रकारांच्या स्पर्धांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
३५१ स्पर्धांमध्ये १६१ महिला स्पर्धा, १६५ पुरुष स्पर्धा आणि २५ मिश्र प्रकारांच्या स्पर्धा असतील.