भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत. तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सत्तेचे वेसन बांधल्या गेल्याने हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले.
शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
मीरा चोप्रा प्रमाणेच इतर २१ जणांचे नियमबाह्य लसीकरण
अपरिपक्वता की श्रेयवाद? फडणवीसांचा सवाल
बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे
अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या
पडळकरांनी काल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. शरद पवार साहेबांची बदनामी करण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन केलेली एक चाल आहे. त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले होते. पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांची विचारसरणीच वाईट आहे, असं उत्तर मुश्रीफांनी दिलं. त्यावर पडळकरांनी पलटवार केला आहे. आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गावागावात कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, अशा परिस्थितीत कोरोनामुक्त गावांची स्पर्धा कशी भरवता, असा सवाल पडळकर यांनी विचारला होता.