महाराष्ट्रात सध्या रुग्णांची सख्या वेगाने वाढत आहे. सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सुरूवातीलाच पत्रकारांनाच “लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार?” असा खडा सवाल केला.
ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटीची विनंती केली होती, मात्र माझ्या आजूबाजूचे अनेक लोक पॉझिटीव्ह असं मुख्यमंत्र्यांनी सांगून ते स्वतः सुद्धा क्वारंटाईन असल्याचं राज ठाकरे यांनी सांगीतलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट झूम वरून झाली.
“आधीच्या लाटेपेक्षा ही मोठी लाट आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरून येणारे लोक अनेक आहेत पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका होत आहेत, शेतकरी आंदोलन होत आहे तरी तिथे करोना नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का आहे?” अशा प्रश्नाने राज ठाकरे यांनी सुरूवात केली.
हे ही वाचा:
गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे
नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन
ते म्हणाले “आपल्याकडे बाहेरून रोजच्या रोज येणारे लोक खुप आहेत. मागच्या वेळेलाही सुचवलं की हे परत येतील तेव्हा त्यांची मोजणी करा आणि चाचणी करा पण राज्य सरकारने ते केलं नाही.” त्याबरोबरच “बाहेरच्या राज्यात रुग्ण मोजले जात नाहीत, आणि महाराष्ट्रात मोजले जातात त्यामुळे आपली परिस्थिती भयानक दिसते. जर बाहेरच्या राज्यांनी मोजले, तर त्यांचीही परिस्थिती कळेल.” असेही ते म्हणाले.
टाळेबंदी बाबत बोलताना “सर्वांची वाताहत होणं हे चांगलं नाही.” असं मत त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारला काही सुचना त्यांनी केल्या त्या त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या. ते म्हणाले, “छोट्या उद्योगांना उत्पादनाला परवानगी दिली पण विक्रीला बंदी, मग उत्पादन कशासाठी करायचं? त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना किमान २-३ दिवस दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी.” त्याबरोबरच बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या वसूलीची सक्ती, जबरदस्ती थांबवावी अशी विनंती देखील त्यांनी केली.
“सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करा. त्याबरोबरच राज्याने जीएसटी माफ करावा आणि जीएसटी बाबत केंद्राशी बोलून घ्यावे” असेही त्यांनी सुचवले.
“कंत्राटी कामगारांना परत बोलवून शक्य होईल त्याठिकाणी त्यांना कायम करा. तहान लागल्यावर विहीर खणणं हा प्रकार योग्य नाही” असे राज ठाकरे यांनी सांगितले. छोट्या उद्योगांमध्ये सलून, किंवा इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना २-३ दिवस दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी, अशी सुचना त्यांनी सरकारला केली.
खेळाडूंना सरावासाठी सवलत दिली पाहिजे. त्यांना त्यांच्या खेळाचा सराव करायला मिळाला पाहिजे, त्याची देखील सरकारने काळजी घ्यावी हे देखील राज ठाकरे यांनी सुचवले.
या काळात शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कारण शेतकरी कोसळला तर त्याचे वेगळे गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला.
“एका बाजूला शाळा बंद आहेत, मात्र फी आकारली जात आहे. याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. यावर्षीच्या १०वी १२वी च्या विद्यार्थ्यांना थेट पास करायला हवे, कारण ते कोणत्या मानसिक ताणातून जात आहेत ते कसं कळणार? परिक्षा कशी होणार त्याचा निकाल याचा मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा सरकारने विचार करावा.” असेही त्यांनी सांगितले.
“सर्वात शेवटी या सुचनांवर विचार करतील अस निदान ऐकाताना तरी वाटलं. काही सुचना त्यांनी मान्य करून मंत्रीमंडळाशी चर्चा करून निर्णय घेण्याची तयारी दाखवली.” असेही त्यांनी सांगितले.
“या लाटेत लोकांना किमान बेड्स मिळायला हवे होते. रुग्णालय बेड्स उपलब्ध असून देत नसतील तर ती हॉस्पिटल्स करायची काय? आमदार, नगरसेवक फोन करतात त्यांना बेड द्यावे लागतात म्हणून एका हॉस्पिटलने खाटा रिकाम्या ठेवल्या याला काय अर्थ आहे” असा घणाघाती हल्ला देखील त्यांनी केला. त्याच वेळी हॉस्पिटल्सना सरकारने तातडीने जाणिव करून द्यायला हवी असेही सांगितले.
“आरोग्याबाबत सर्वांनी समन्वय ठेवावा. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी यावर चर्चा करावी. राज्य सरकारला एकट्याला बोलून उपयोग नाही”, असेही ते म्हणाले. त्याबरोबरच लसीकरण वाढवायला हवे अशी मागणीही केली.
सचिन वाझे आणि अंबानींच्या घरासमोरील गाडी बाबत विचारले असता, “अनिल देशमुख यांचा विषय महत्त्वाचा नाही तर पोलीसांनी बाँबची गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली हे कळलं पाहिजे मूळ विषय भरकटत जातो” असं त्यांनी सांगितले.
“मंत्र्यांकडूनही असं घडताय ज्यामुळे त्यांना राजिनामे द्यावे लागले. नाहीतर सरकार काय इमारत आहे का की खालचे पिलर काढले आणि इमारत पडली. सरकार असं पडत नाही.” अशी टीका देखील त्यांनी केली. त्यानंतर “मूळ पत्रकार परिषद कोरोनाबाबत होती. त्याला फाटे फोडले जात आहेत.” असे बोलून त्यांनी ही पत्रकार परिषद थांबवली.