राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

मराठा आरक्षणावरून भाजपा खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपामध्ये मतभेद वाढताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केली आहे. राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यावर संभाजी छत्रपती काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खासदार संभाजी छत्रपती यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून निलेश राणे यांनी ट्विट करून संभाजीराजेंवर टीका केली आहे. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, काल संभाजी छत्रपती यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री ८ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे म्हणाले होते.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

संभाजीराजे आणि पवारांच्या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली होती. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा १० मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असं मेटे म्हणाले होते. त्यानंतर राणेंनी टीका केल्याने संभाजीराजे आणि भाजपामध्ये मतभेद वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Exit mobile version