‘एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका

‘एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही’

एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही, हे जाणून असल्यानेच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. त्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपद नगण्य होते. मात्र त्यांचे वारस असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मनात अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिकमधील विजय करंजकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. विजय आप्पांचे जसे शेवटच्या दिवसापर्यंत नाव होते, तसेच आपलेही शेवटच्या दिवसापर्यंत नाव होते, मात्र शिवसैनिकाला दूर सारुन स्वत:च मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला.

काँग्रेसला बाळासाहेबांनी नेहमीच दूर ठेवले, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी सोबत घेतले, कडेवर घेतल, डोक्यावर घेतले. एका खूर्चीपायी शिवसैनिकांचे खच्चीकरण सुरु झाले. आमदार सैरभैर झाले. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत होते. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेना प्रमुखांचे विचार कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आपण धाडसी निर्णय घेतला.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका तारखा जाहीर’

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!

मुंबई पोलिसांच्या हाती पैशाचं घबाड, नाकाबंदी दरम्यान व्हॅनमधून सापडले ४ कोटी ७० लाख रुपये!

जेव्हा ५० आमदार टोकाची भूमिका घेतात तेव्हा कारण देखील टोकाचे असते. त्यांना खोक्यांशिवाय झोप लागत नाही. राज ठाकरे म्हणाले होते यांना खोके नाही कंटेनर लागतो. शिवसेना भाजप युतीचा कौल नाकारुन कॉंग्रेसला सोबत केली आणि सरकार स्थापन केले मग तुम्हाला महागद्दार म्हणायचे का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उबाठाला केला. धर्मवीर सिनेमात ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा शब्द आहे. जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवण्याचा तुम्ही घाट घातला तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हा शब्द तुम्हाला लागू झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उबाठाचा रेक्ट कार्यक्रम केल्याने देशभर या उठावाची दखल घेतली गेली. राजस्थानमधून ४ अपक्ष आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. २५ राज्यातील लोक शिवसेनेसोबत आहे. निवडणुकीत तिकिट विकण्याची कामे त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे, नारायण राणे , छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासारखी चांगली माणसे शिवसेना सोडून गेली. म्हणून शिवसेना कधीही स्वबळावर राज्यात सत्तेत आली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रीक करणार आहेत तसेच नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा संसदेत जाणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसने केवळ मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला. विकासाचा अजेंडा घेऊन महायुती पुढे चालली आहे. राज्यातील प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version