शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देत आहे, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट केले. “भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!”, असे शेलार म्हणाले.
हेही पाहा:
येत्या 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजंयती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करत राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी गुरुवारी नियमावली काढली होती. मात्र, यावरुन भाजपाकडून टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारने हे नियम शिथिल केले.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं!
सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!पण खबरदार जर
जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
असे सरकारचे आदेश पण आलेत.त्यामुळे सांभाळा!
अजब वाटले तरी नियम पाळा!!
ठाकरे सरकार करेल,
तेच नियम आणि तेच कायदे!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2021
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे त्या पत्रकात म्हटले आहे.