उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मोफत रेशन वाटण्याचा कालावधी वाढवला आहे. यूपी राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेसाठी अन्न व रसद विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये मोफत रेशन वाढवण्याची घोषणा केली होती. राज्य सरकार ही योजना लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच २०२४ पर्यंत वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. युपी राज्यात सुमारे १५ कोटी या योजनेचे लाभार्थी आहेत.
महागाई वाढल्याने मोफत रेशन देण्याचा उल्लेख प्रस्तावात असल्याचे सांगण्यात येत आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवावी, अशी चर्चा सरकारमध्ये सुरू आहे. सध्या सहा महिन्यांसाठी ही योजना जाहीर होईल, असे मानले जात आहे. त्याचबरोबर योजनेत एकाच वेळी वाढ न करता दोन ते तीन टप्प्यांत वाढ करण्यात यावी असे मत व्यक्त केले जात आहे. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या रेशन व्यतिरिक्त गहू आणि तांदूळ, एक लिटर तेल, एक किलो हरभरा मीठ दिले जाणार आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली
आतापर्यंत राज्य सरकारने डिसेंबर ते मार्चपर्यंत मोफत रेशन दिले आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य आणि पात्र घरगुती कार्डधारकांना ५ किलो म्हणजे तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रति युनिट दिले जाते. यासाठी कार्डधारकांकडून गव्हासाठी किलोमागे दोन रुपये आणि तांदळासाठी तीन रुपये प्रतिकिलो आकारले जात असले तरी आता त्याचा खर्च युपी राज्य सरकार उचलणार आहे.