ईडीला दिलेल्या जबाबात झाले उघड
येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी ईडीसमोर दिलेल्या एका कबुलीमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्याला एमएफ हुसेन यांचे चित्र त्यांच्याकडून विकत घ्यायला भाग पाडले होते, असे विधान करत त्याबद्दल्यात पद्मभूषण पुरस्कार देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच हे पैसे काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्यावर न्यूयॉर्क येथे होणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करण्यात आले, असे कपूर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
ईडीने विशेष न्यायालयात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात राणा कपूर यांचे हे म्हणणे नमूद केले आहे. प्रियांका गांधी यांनी आपल्याला २ कोटी रुपयांचे हे चित्र विकत घेण्यासाठी आग्रह धरला होता. त्याशिवाय, माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी हे चित्र विकत घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळू शकेल असे मत व्यक्त केले होते.
हे ही वाचा:
गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न
या आरोपपत्रात म्हटले आहे की, मुरली देवरा यांनी आपल्याला इशारा दिला होता की, जर हे चित्र विकत घेण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबियांची मर्जी तुम्ही गमावून बसाल आणि पद्मभूषण पुरस्कारापासूनही तुम्हाला वंचित राहावे लागेल. मुरली देवरा यांनी मला विविध मोबाईल फोनवरून अनेकवेळा संपर्क साधला आणि मेसेजेसही पाठवले. पण मी त्यांच्या या ऑफरमध्ये अजिबात रस दाखविला नाही. त्यासाठी मी त्यांचे फोनही घेतले नाहीत किंवा मेसेजेसही टाळले तसेच त्यांची भेटही घेतली नाही.
येस बँकेचे सहसंस्थापक असलेले कपूर यांच्यावर मनीलाँडरिंगचे आरोप आहेत. कपूर म्हणाले की, या चित्राच्या विक्रीतून जमणारे पैसे ते सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्क येथे होणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरणार होते. यातूनच येस बँकेच्या घोटाळ्यात गांधी कुटुंबियांचा हात असल्याच्या संशयाला वाव मिळतो आहे, हे उघड होत असल्याचे म्हटले जात आहे.