यशवंत जाधवांची मालमत्ता वाढता वाढता वाढे!

यशवंत जाधवांची मालमत्ता वाढता वाढता वाढे!

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची जोरदार वातावरणनिर्मिती सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर गेले काही दिवस आयकर विभागाची कारवाई सुरू असून या कारवाईत आता नवीन तपशील समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे सभापती असलेले यशवंत जाधव हे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यशवंत जाधव यांच्या विरोधात आयकर विभागाला सज्जड पुरावे सापडले असून त्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली. पण आता या मालमत्तांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. आयकर खात्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार यशवंत जाधव यांच्या मालमत्तांची एकूण संख्या वाढली असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने समजते. यशवंत जाधव यांच्या एकूण मालमत्तांची संख्या ५३ वर गेल्याची माहिती आयकर विभागाच्या चौकशीत समोर आली आहे. आधी या मालमत्तांचा आकडा ३६ होता.

हे ही वाचा:

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

या सोबतच यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्स कडून दागिने खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. दागिने खरेदीचा हा सर्व व्यवहार रोखीने झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व दागिन्यांची किंमत ६ कोटी असल्याची माहिती समोर येत आहे. यशवंत जाधव यांनी आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी एका इमारतीची खरेदी जाधव यांनी केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समजते. या संपूर्ण व्यवहारातून यशवंत जाधव यांनी ८० कोटींचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला.

या सर्व तपासातून यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर आयकर विभागाच्या तपासातून आणखी काय माहिती समोर येते आणि जाधव यांच्यावर येणाऱ्या काळात नेमकी काय कारवाई होताना दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version