यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना आयकर विभागाकडून मोठा दणका मिळाला आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तब्बल ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत.

या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाल्याची माहिती आहे. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्यांचीही आयकर विभागाने चौकशी केली आहे. वेगवेगळ्या मार्गांनी फिरवलेल्या पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहिते यांच्या नावावर भायखळा परिसरात इंपेरिकल क्राऊन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा आणि पुतण्यायांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, ते हजर राहिलेले नाहीत.

हे ही वाचा:

ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI

अनुराधा पौडवाल म्हणतात, फक्त भारतातच दिसतात अजानचे लाऊडस्पीकर

दरम्यान, यशवंत जाधव यांच्या घरातून डायरी मिळाली होती. या डायरीमध्ये काही व्यवहारांच्या नोंदी सापडल्या होत्या. यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद होती. मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचे यशवंत जाधवांनी सांगितले होते. त्यानंतर या डायरीमध्ये आणखी दोन नावांचा उल्लेख आढळून आल्याची माहिती काल समोर आली आहे. त्यांच्या डायरीतील ‘केबलमॅन’ अशा नावासमोर त्यांनी ७५ लाख, २५ लाख आणि २५ लाख असे एक कोटी २५ लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर ‘M-TAI’ नावासमोर ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. जाधव यांच्या डायरीतले ‘केबलमॅन’ आणि ‘M-TAI’ असा उल्लेख असणारे हे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समोर आलेले नाही.

Exit mobile version