बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक शोषण; विनेश, साक्षी, बजरंगकडून गंभीर आरोप

खेळाडू जंतरमंतरमध्ये बसले आंदोलनाला

बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक शोषण; विनेश, साक्षी, बजरंगकडून गंभीर आरोप

नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आणि राज ठाकरे यांना अयोध्येला येण्यापासून रोखणारे भाजपा खासदार आणि राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष  बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

ऑलिम्पिक कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी जंतर मंतर येथे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विनेश फोगाटने बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेशने म्हटले आहे की, प्रशिक्षक हे महिला खेळाडूंना सतावत आहेत. काही प्रशिक्षक हे कुस्ती महासंघाच्या मर्जीतील आहेत त्यांच्याकडून महिला प्रशिक्षकांचीही छळवणूक होत आहे. ते महिला कुस्तीगीरांचा लैंगिक छळ करत आहेत. एवढेच नव्हे तर महासंघाचे अध्यक्षही अनेक मुलींचा लैंगिक छळ करत आहेत.

विनेश म्हणते की आपल्याला याचा सामना करावा लागलेला नाही पण भारतीय कुस्तीमधील अनेक समस्या आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे आपल्याला महासंघाच्या अध्यक्षांच्या वतीने धमक्या देण्यात आल्या. टोकियो ऑलिम्पिकनंतर आपण पंतप्रधानांना भेटलो तेव्हा त्यांच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या होत्या.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

या आरोपांना उत्तर देताना बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे की, अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. जर तसे घडले असेल तर मी स्वतःला फाशी लावून घेईन. हे आरोप गंभीर आहेत. पण त्यात माझेच नाव गोवण्यात आल्यामुळे मी त्यावर कारवाई कशी काय करू शकतो. त्यामुळे मी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतो. पण आपण महासंघाच्या अध्यक्षपदावरून दूर होणार नाही.

बृजभूषण यांनी विचारले आहे की, याच कुस्तीगीरांना गेल्या १० वर्षात महासंघाकडून कोणत्याही तक्रारी का नव्हत्या. पण जेव्हा नवे नियम आणि अटींचा अंतर्भाव करण्यात आला तेव्हा या घडामोडी घडू लागल्या. ऑलिम्पिकनंतर हे आंदोलनाला बसलेले खेळाडू कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले नाहीत, असेही सिंह म्हणाले. सिंह म्हणाले की, कोणतेही खेळाडू कितीही प्रसिद्ध असो त्यांना चाचणीसाठी उपस्थित राहावेच लागेल. हा निर्णय घेतल्यामुळेच खेळाडूंनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

फोगाटप्रमाणेच राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णविजेता पुनिया म्हणतो की, नियम आणि अटींच्या आधारे खेळाडूंचा छळ केला जात आहे. जे महासंघाचे सदस्य आहेत त्यांचा कुस्तीशी काहीही संबंध नाही. ही हुकुमशाही खेळाडू सहन करू शकत नाहीत. महासंघाचे व्यवस्थापन बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यासंदर्भात आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे. साक्षी मलिकने म्हटले आहे की, संपूर्ण महासंघातच आमूलाग्र बदल केले गेले पाहिजेत. नवा महासंघ तयार केला पाहिजे. अगदी खालच्या स्तरापासूनच महासंघात घाण निर्माण झाली आहे. आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याची माहिती देणार आहोत.

Exit mobile version