लखीमपूर येथे घडलेल्या घटनेवरून सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सरकारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वसामान्यांवर अरेरावी करताना आणि कायदा सुव्यवस्था हातात घेताना दिसले. कुठे रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली, तर कुठे दुकाने बंद करण्यासाठी जोर जबरदस्ती केली. पण जळगाव मधून एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगावमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी बंदच्या आडून चक्क एका सभ्य, प्रामाणिक दुकानदाराला लूटण्याचा प्रयत्न केला आहे. जळगावमधील नवी पेठ भागात हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या नवी पेठ भागातील एका दुकानात शिरल्या. ते खाद्यपदार्थांचे दुकान होते. तिथून त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. चार लस्सीची पाकिटे, अमोल कुलच्या दोन बाटल्या आणि उपास चिवड्याचे एक पाकीट असा तब्बल १९० रुपयांचा माल त्यांनी खरेदी केला.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग
आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला
काय आहे मोदी सरकारने सुरु केलेली आयएसपीए?
‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’
जेव्हा दुकानदाराने या मालाची रक्कम त्यांच्याकडे मागितली तेव्हा गाडीतून घेऊन येतो असे उत्तर त्याला देण्यात आले. हा सर्व माल घेऊन त्या शिवसेनेच्या पदाधिकारी आपल्या गाडीत जाऊन बसल्या. गाडीत बसल्या बसल्या गाडीच्या काचा वर करण्यात आल्या आणि गाडी निघू लागली. दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्यांने गाडीच्या दिशेने धाव घेतली. गाडी थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला. आपले हक्काचे पैसे तो त्यांच्याकडे मागत होता. पण गाडी थांबली नाही. उलट गाडीचा वेग वाढवण्यात आला. ज्यामुळे दुकानदाराला अपघात होऊन त्याच्या गुडघ्याला इजा झाली.
दुकानदार पडल्याचे लक्षात येताच गाडी थांबवली गेली. या महिला कार्यकर्त्या गाडीतुन खाली उतरल्या. त्यांची आणि दुकानदाराची हुज्जत झाली. अखेर त्या दुकानदाराला त्याचे हक्काचे पैसे देण्यात आले. या घटनेच्या विरोधात जळगावमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून सत्ताधारी पक्षाने पुकारलेला बंद नेमका कशासाठी होता हा प्रश्न विचारला जात आहे.