गणेश नाईकांना बलात्कार प्रकरणात अडकविण्याची दिली सुपारी

आरोप करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केले गेले, महिलेचे स्पष्टीकरण

गणेश नाईकांना बलात्कार प्रकरणात अडकविण्याची दिली सुपारी

नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानुसार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा देखील झाला होता. त्यानंतर नाईक यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन देखील मिळवला होता. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्यावरील आरोप मागे घेतला आहे.

गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. मात्र, आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी हे सर्व करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप दीपा चौहान यांनी केला आहे.

दीपा चौहान यांनी पोलिसांना लिहिलेल्या अर्जात लिहिले आहे की, आमदार गणेश नाईक यांच्याशी माझ्या वडिलांचे आणि भावाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. मला समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यानिमित्ताने माझी मंदा म्हात्रे यांच्याशी ओळख झाली होती. मंदा म्हात्रे यांनी त्यांचे राजकीय विरोधक गणेश नाईक यांच्याविरोधात खोटे बलात्काराचे तसेच मुलाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली, असे खोटे आरोप करण्यास सांगत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. तसेच विजय चौगुले यांच्याशी माझी ओळख करून दिली. चौगुले यांनी एका वकिलाला बोलावून गणेश नाईक यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह दाखल करून त्यांची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करायचे अशा प्रकारची चर्चा केली, असा आरोप दीपा चौहान यांनी पत्रात केला आहे.

शिवसेनेतून निवडणुकीसाठी संधी आणि आणि जीवन उदरनिर्वाहसाठी पैसे देण्याचे आश्वासन दीपा चौहान यांना देण्यात आलं होतं. परंतु, काम झाल्यानंतर टाळू लागण्याचा आरोप दीपा चौहान यांनी केला आहे. तसेच या पत्रामुळे जीवास धोका असून काही घडल्यास आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना दोषी धरण्यात यावं, असंही दीपा यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकावल्याची तक्रार दिली होती. गणेश नाईक हे आपल्यासोबत मागील गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्यांच्यासोबतच्या संबंधातून आपल्याला एक १५ वर्षाचा मुलगा आहे. नाईक यांनी आपल्या मुलाला वडील म्हणून त्यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली असता नाईक यांनी त्यास नकार दिला, असे आरोप महिलेने केले होते. त्यानंतर महिलेने गणेश नाईक यांच्या राजकीय विरोधकांच्या मदतीने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली होती.

हे ही वाचा:

इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार

अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!

संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार

गणेश नाईक यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावलं तसेच सतत बलात्कार केल्याचा आरोप देखील केला होता. या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी बेलापूर आणि नेरूळ इथं नाईक यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. आपल्याला न्याय मिळावा म्हणून तक्रारदार महिलेनं महाराष्ट्र महिला आयोगाकडेही तक्रारही केली होती.

Exit mobile version