काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार, १६ ऑगस्ट रोजीच काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक समित्यांचे प्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, आझाद यांनी काही तासातच राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. काल काँग्रेस पक्षाने प्रचार समिती तयार केली होती. यामध्ये एकूण ११ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. काश्मिरसाठी काँग्रेसने गुलाम नाबी आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष केले होते. पण नियुक्तीच्या काही तासांमध्येच त्यांनी आपला राजीनामा दिला.
हे ही वाचा:
ट्रक- कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला
विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी
प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी ही स्वीकारण्यास नकार दिला असल्याची माहिती ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. तर गुलाम नबी आझाद हे नाराज असल्याच्या चर्चा देखील आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. गुलाम नबी आझाद काँग्रेसवर नाराज आहेत का? असे सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही अनेक मुद्यांवरून गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.