विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

राज्याचे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया, विधान परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन  नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरत आहे. विरोधी पक्षांकडून होणारा आरोपांचा मारा थोपविण्यासाठी नागपूरऐवजी महाविकास आघाडी सरकारला मुंबई अधिक सुरक्षित वाटते आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एका वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबरपासून एक आठवडा हे सत्र करण्याचे कॅबिनेट बैठकीत ठरले आहे. याआधी झालेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच होईल, असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात आता मुंबईतच हे अधिवेशन होणार आहे.

अर्थात, यासंदर्भातील अधिकृत निर्णय हा २९ नोव्हेंबरला विधिमंडळ कामकाज समितीच्या माध्यमातून घेतला जाईल. या समितीने चर्चा केल्यानंतर हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होईल, याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याआधी हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार असे ठरले होते. मात्र आता काही स्थानिक निवडणुका, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अधिवेशनाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे.

खरेतर, हे अधिवेशन नागपुरातच व्हावे अशी विरोधी पक्षांची अपेक्षा आहे, पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात्र हे अधिवेशन मुंबईत व्हावे असे वाटते आहे.

 

हे ही वाचा:

परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार

स्वीडनला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान! पण काही तासांतच दिला राजीनामा

वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले

 

या अधिवेशनासाठी कोरोनाचे कठोर नियम असतील. त्यानुसार लसींचे दोन डोस घेतलेले असले तरी प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ सदस्य, सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहाय्यक, माध्यम प्रतिनिधी अशा सर्वांना ही चाचणी करावी लागणार आहे.

Exit mobile version