महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्यापही वाद सुरू आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. याबाबत आता काँग्रेस पक्ष नाराज असून विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सांगलीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासून काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने नाराजी व्यक्त करत हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले. सांगलीतील आमदार विश्वजित कदम, विक्रम सावंत यांनी दिल्ली वारीही केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ स्वतःकडेचं ठेवला. महाविकास आघाडीत कटुता निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. यावर विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी बाळासाहेब थोरात सोमवारी सांगलीत जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय
चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता
मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट
बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न
काँग्रेस महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर बोलताना म्हटले आहे की, “विशाल पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्व गोष्टी पुढे व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्हाला नक्की यश मिळेल.”