देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या मोजक्या राज्यांपैकी एक असणाऱ्या पुदुचेरीत व्ही. नारायणसामी यांच्या सरकारला सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. पुदुचेरीत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीत व्ही. नारायणसामी याचे सरकार पडणार की राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वीच काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुदुचेरी विधानसभेत काठावरचे बहुमत असणारे काँग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे.
हे ही पहा:
या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून ११ झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या १४ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नारायणसामी आज बहुमत चाचणीत काही राजकीय चमत्कार करुन दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अन्यथा निवडणुकीआधीच पुदुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे.
या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला आहे. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे १०, डीएमके ३, ऑल इंडिया एन आर काँग्रेस ७, एआयडीएमके ४, भाजप ३ तर १ अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अयोग्य ठरले आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा १५ चा आहे.
आज संध्याकाळी ५ वाजता नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे.