रमजानच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. सध्या मुसलमानांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे जलील यांनी ही मागणी केली.
येत्या काही दिवसांत रमजानच्या शेवटच्या आठवड्यास सुरुवात होईल. त्यामुळे यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहे. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. ती होऊ नये म्हणून ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतली. या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिलील यांनी केली.
मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली असतात आणि नरकाची दारं बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याने दिलेल्या आदेशानुसार जगण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात.
हे ही वाचा:
कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन
दरम्यान, जलील यांच्या या मागणीनंतर पोलीस आयुक्तांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली नसून आगामी काळात बाजारपेठा उघडण्याच्या मागणीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.