शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?

युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतील वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांनी बारामतीमध्ये मंगळवारी युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार करावा लागेल.

“५५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं. त्याला आता ५०-५५ वर्षं होऊन गेली. मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज राज्यसभेत आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“मी सत्तेत नाही राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

“समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा, लोकांचं काम करतच राहायचं. ज्या भागात दलित, भटके विमुक्त, उपेक्षित या वर्गासाठी जे काही करता येईल, ते करायचं हा निर्णय आहे. निवडणूक आता नको हे मी ठरवलं आहे. पण तसं असलं, तरी राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यासाठी नवी पिढी तयार करायला पाहिजे,” असं शरद पवार सभेत म्हणाले.

हे ही वाचा : 

‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’

सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही

चौकशीसाठी हजर राहा! सिद्धरामय्या यांना समन्स

‘हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनवू’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधी शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर पक्षात फूट पडली आणि अजित पवार गटाने सत्ताधारी महायुतीला साथ दिली.

Exit mobile version