काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणावरून त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून तसेच देशभरातून टीकेची झोड उठली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी मात्र संसदेत दिसले नाहीत. मात्र ते लंडनहून परतले आहेत आणि आता गुरुवारी संसदेत येत असून त्यावेळी या सगळ्या भाषणासंदर्भात आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी या विद्यापीठातील भाषणाच्या निमित्ताने लंडनला होते. त्यामुळे आता परतल्यावर ते आपली भूमिका इथे संसदेत मांडणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. कदाचित ते पत्रकारांशीही संवाद साधू शकतील.
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणात भारतात लोकशाही नसल्याचे विधान केले होते. लोकशाहीवर सातत्याने हल्ले होत असून आपल्याला बोलूही दिले जात नाही. आपला माईक बंद करून ठेवण्यात येतो. भारतातील सर्व संस्थांवर भाजपा आणि आरएसएस यांनी कब्जा केला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती.
त्यानंतर संसदेत सध्या सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात याचे पडसाद उमटले. सत्तारुढ भाजपाने राहुल गांधींनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, देशातील प्रत्येक नागरीक आज राहुल गांधींकडून माफीची मागणी करत आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही राहुल गांधींकडे माफीची मागणी केली.
हे ही वाचा:
लालबाग हत्या, मुलीने तीन महिने आईच्या मृतदेहासोबत काढले
फडणवीसांनी ‘अजितदादां’ची केली कोंडी आणि मारली मुसंडी
मुंबईत घामाच्या धारांनंतर आता पावसाच्या धारा, अवकाळी आभाळ फाटले!
संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!
तिकडे काँग्रेस मात्र अदानींनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत व्हावी याची मागणी करत आहे. त्यासाठी संसदेत जोरदार हंगामा गेले काही दिवस सुरू आहे. राहुल गांधी यांच्याबाबत काँग्रेसने म्हटले आहे की, ज्यांना राहुल गांधींकडून माफी हवी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही देशात गेले तिथे भारतात जन्म घेणे पाप आहे असे ते म्हणाले होते. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही. खरे बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. हा लोकशाहीचा अंत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी ईडीच्या कार्यालयाकडेही मार्च काढला. अदानी प्रकरणी ईडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.