नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही. त्यात मी पडत नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांची जागा दाखविली आहे. यामुळे महाराष्ट्रात आलेल्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये धूसफूस वाढली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीत पाठीत सुरा खुपसला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लोणावळा येथे केला होता. त्यासंदर्भात बारामती येथे पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी पटोलेंच्या वक्तव्याला आपण फारशी किंमत देत नाही, हे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल उपस्थित करत लोणावळ्यातील मेळाव्यात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले. आपण काही बोलायचं नाही, पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. त्याच्यामुळे आपण कामाला लागा. आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असं पटोले म्हणाले होते.
हे ही वाचा :
लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी
अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी
ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!
दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या स्वबळाची भाषा करत आहेत. पण मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर त्यांचा सूर बदलला होता. आता पुन्हा एकदा ते स्वबळाचा राग आळवत आहेत. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाही. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालते आहे, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एकमेकांच्या तंगड्या खेचण्याचे प्रकार तिन्ही पक्षातील नेत्यांकडून होताना दिसत आहेत.