मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने सात तास चौकशी केल्यानंतर बुधवारी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना बुधवारी अटक करण्यात आली. सोरेन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर ‘आपण पराभव स्वीकारणार नसून लढत राहणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत सोरेन यांनी आपण पराभव स्वीकारणार नाही, हे सांगण्यासाठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ शिवमंगलसिंह सुमन यांच्या हिंदी कवितेच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. कठीण परिस्थितीतही आपण खंबीरपणे लढू, असा या कवितेचा अर्थ आहे.
बुधवारी ईडीने हेमंत सोरेन यांची सात तास चौकशी केल्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर ईडीने त्यांना लगेचच अटक केली. ४८ वर्षीय सोरेन यांना लगेचच रांची येथे नेण्यात आले. ईडीचे अधिकारी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी सोरेन यांना रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर सादर करण्याची शक्यता आहे. तेथे ईडीचे अधिकारी त्यांच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करतील.
हे ही वाचा:
चक्रव्यूहातून सुटकेचा फक्त आभास…
आठ महिन्यांनी चिनी कबुतराची पिंजऱ्यातून सुटका
कांदिवली चारकोपच्या नर्सरीत पुरले २० दिवसाचे मूल
क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ झाली. नवा मुख्यमंत्री कोण होईल, यावर सत्ताधारी पक्षाच्या बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते. अखेर झारखंडचे वाहतूक मंत्री चम्पाई सोरेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर चम्पाई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर ४७ आमदारांचा पाठिंबा जाहीर करून सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी याबाबत माहिती दिली.
.