राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव निश्चित केले आहे. घोषणा करण्याची औपचारिकता तेवढी आता शिल्लक आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नाना पाटोले हे काँग्रेस पक्षाच्या काही आक्रमक नेत्यांपैकी एक आहेत. भाजपाचे सर्वाधिक आमदार असलेल्या विदर्भातून ते निवडून आले आहेत. या बरोबरच भाजपाचा पारंपारिक मतदार असणाऱ्या ओबीसी समाजाचे ते नेतृत्व करतात. या सर्व बाबींमुळे नाना पटोलेंचे नाव सगळ्यात पुढे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी नाना पाटोलेंच्या नावाची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांनी विदर्भाच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळावं अशी मागणी पक्षश्रेष्टींकडे केली. बाळू धानोरकर हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. या त्यांच्या मागणीमागे नेमका हेतू काय आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
नाना पाटोले हे वर्तमान विधानसभा अध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्ष पद हे संविधानिक पद असल्यामुळे त्या पदावरील व्यक्ती ही पक्षीय राजकारणात सक्रिय नसावी असा प्रघात आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षश्रेठींच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.