“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन

“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन

ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मनसुख यांनी आत्महत्या केली असा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आत्महत्येची शक्यता फेटाळली आहे. माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत असे विमला हिरेन यांनी सांगितले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी ठाण्याच्या खाडीत सापडला. त्यानंतर मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन या माध्यमांसमोर आल्या. आपल्या पतीच्या मृत्यूच्या धक्यातून त्यांना सावरणे कठीण जात होते. पण अशा स्थितीतही आपले मन घट्ट करत त्यांनी आपली बाजू सांगितली.

“मी आणि माझा परिवार असा विचारही करत नव्हतो की असे काही घडेल” असे विमला हिरेन यांनी सांगितले. आमची गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलीसांकडे केली होती. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. पोलीस माझ्या पतीला चौकशीसाठी बोलवायचे आणि दिवस दिवस बसवून ठेवायचे. गुरुवारीही त्यांना चौकशीसाठी बोलावले म्हणून ते गेले. पण ते परत आले नाहीत. कांदिवली क्राईम ब्रँचच्या तावडे नावाच्या एका अधिकाऱ्याचा त्यांना फोन आला होता. त्यांना भेटायला म्हणून माझे पती गेले. रात्री दहा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला. आज बातम्यांमधून आम्हाला समजले की मनसुख यांनी आत्महत्या केली आहे. पण माझे पती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांच्यावर कुठलाही ताण अथवा दबाव नव्हता.

विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी आपल्या भाषणात हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा आणि मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केली होती. पण त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची बातमी आली.

Exit mobile version