माहिम किल्ल्यापासून वांद्रे बँडस्टँडपर्यंतच्या जागेत सायकल ट्रॅक तयार करण्याचा महापालिकेने घाट घातला. या एकूणच प्रकल्पावर मात्र भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. शेलार यांच्यासह वांद्रे येथील रहिवाशी संघटना तसेच नागरिकांनीही या १६८ कोटींच्या वॉक-वे-सायकलिंग ट्रॅकला विरोध केलेला आहे.
महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात शेलार यांनी निदर्शनास आणून दिले की ३.७३ किमी ट्रॅकची किंमत प्रति किमी ४४.६५ कोटी रुपये असेल, जे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याच्या खर्चापेक्षा ५००% जास्त आहे. शेलार यांनी यासंदर्भात विरोध करत एकूणच या प्रकल्पाचे घाईघाईने नियोजन करण्यात आले आहे असेही म्हटले आहे. मुख्य म्हणजे याकरता नागरिक तसेच स्थानिकांना विश्वासात न घेताच हा प्रकल्प महापालिका कसे काय राबवू शकते असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाला आता विरोध होऊ लागला आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना १६७ कोटी खर्चून हीे मार्गिका तयार करण्याची काय गरज, असा सवाल करीत समाजवादी पार्टीने या प्रकल्पाला विरोध केला आहे.
वांद्रे रिकलेमेशन एरिया स्वयंसेवक संघटना (BRAVO) यांनीही या प्रकल्पाला विरोध केलेला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र दुसर्या कोरोना लाटेशी झगडत आहे. तिसरी लाट येण्याच्या मार्गावर असताना महापालिका असा उगाच वायफळ खर्च का करत आहे असेही आता स्थानिकांकडून मत व्यक्त केले जाते आहे. त्यापेक्षा जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या पैशाचा वापर केला पाहिजे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, नारायण राणेंचा दावा
देवरे प्रकरणी समाजकंटकांवर कारवाई होणार का?
शाळांसाठी पालिकेने घेतला ‘टॅब’डतोब निर्णय
अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आणि अर्थसंकल्पातील मूलभूत विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडत असताना असे प्रकल्प आणण्याची गरज काय, असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी शेख यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळेच आता हा सायकल ट्रॅक सुरु होण्याआधीच बंद पडतो की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.