नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान शिवसेनेला फारच झोंबले. खरे तर, अशा वक्तव्यांनी शिवसेनेने बिथरून जाण्याची अजिबात गरज नव्हती. कारण आपल्या भाषणांतून, अग्रलेखातून इतरांना कस्पटासमान लेखणे, त्यांच्यावर अद्वातद्वा आरोप करणे, त्यांना हाडतुड करणे, त्यांची अवहेलना करणे हा शिवसेनेचा पिंड राहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून आपल्या विरोधकांचा कधीही मुलाहिजा ठेवला नाही. पण ते फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभत होते. आज उद्धव ठाकरे ज्या शरद पवार, राहुल गांधी यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्यावर अनेकवेळा त्यांनी चिखलफेक केलेली आहे. त्याचे व्हीडिओ या सगळ्या वादांच्या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी त्याच खालच्या भाषेत टीका केलेली आहे. मग आज नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने शिवसेनेला राग येण्याचे कारण काय? नारायण राणे यांच्यावर तुमचा वैयक्तिक राग असू शकेल पण तो राग म्हणजे महाराष्ट्राची भावना नाही किंवा नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अवमानही नाही. पण शिवसेनेने त्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सन्मानाचा मुद्दा बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे कधीपासून महाराष्ट्राची अस्मिता बनले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत नारायण राणे यांनी भाष्य केले होते. त्यावर इतके अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते. मुळातच राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर भारताचा कितवा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करत आहोत, हे ठाऊक नाही म्हणून टीका होत असेल तर त्यात वाईट वाटण्याचे कारण काय? त्याबद्दल खरे तर विनम्र आणि संयमी म्हणून गौरविल्या गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करून विषय सोडून द्यायला हवा होता. पण ते न करता राणे यांना त्या वक्तव्याबद्दल अटक करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही तर बेबंदशाही झाली. अशीच कठोर कारवाई केली गेली तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जन्मठेपच होऊ शकेल. शिवसेनेला कुणावरही अशा ठाकरी शैलीने प्रहार करण्याची पूर्ण सूट आहे तर ती अन्य पक्षातील नेत्यांना, सर्वसामान्यांनाही आहे. आम्हीच फक्त हवे त्याला, हवे त्या शब्दांत ठोकून काढू, पण आम्हाला कुणी बोलले तर त्याला धडा शिकवू हे कसे चालेल?
नारायण राणे यांना झालेली अटक अर्णब गोस्वामीच्या अटकेची आवर्जून आठवण करून देणारी आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण सातत्याने लावून धरणाऱ्या अर्णबला तेव्हा महाविकास आघाडीने लक्ष्य केले होते. त्याच्या घरी सशस्त्र पोलिस पाठवून त्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आले. कंगना रनौटने सरकारविरोधात ट्विट केले तेही ठाकरे सरकारला सहन झाले नाही. तिच्या कार्यालयावर हातोडा मारण्यात आला आणि ‘उखाड दिया’ म्हणत स्वतःचे कौतुकही केले गेले. एका नौदल अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीनंतर त्याला तुडवण्यात आले. सरकार म्हणून तुमच्यावर कुणी टीका केली, मुख्यमंत्र्यांना जाब विचारला तर त्याच्यावर पोलिसी कारवाई करून त्याला दमात घ्यायचे हा काय प्रकार आहे? मग ही पोलिसी कारवाई शर्जिल उस्मानीवर करताना हात का थिजतात? महाराष्ट्रात येऊन हिंदू सडला आहे अशी तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणारा कसा काय मोकळा राहतो? त्याला पकडण्याची हिंमत आता उत्तर प्रदेश सरकारने दाखवावी, असा उलटा प्रचार कसा काय केला जातो?
मुळात नारायण राणे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच महाविकास आघाडीची चुळबूळ सुरू झाली. जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाचे निर्बंध मोडले जातील, ते खपवून घेतले जाणार नाही, अशी भाषा केली जाऊ लागली. नारायण राणेंवर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. ही खरे तर या अटकेमागील खरी पार्श्वभूमी आहे. कारण राणे यांना अटक केली की, आपोआपच जनआशीर्वाद यात्रेला खीळ बसेल आणि महाविकास आघाडीविरोधातील वातावरण तयार होणार नाही, हा उद्देश होता. पण त्याला कोरोना निर्बंधांचा मुलामा लावण्यात आला. मग मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या केलेल्या उद्घाटनावेळी असलेली गर्दी ही कोणते निर्बंध पाळणारी होती? ज्या वरुण सरदेसाई यांनी मंगळवारी राणे यांच्या वक्तव्यावर राडेबाजी केली, त्यांच्याही सभेला अशीच गर्दी होती. इथेही नियम फक्त तुम्हाला आम्ही मात्र नियमांच्या पलिकडे आहोत, हेच दाखविण्याचा प्रयत्न होता. हे जर नियम सगळ्यांना सारखेच असतील तर मग नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात जी राडेबाजी सुरू आहे, दगडफेक सुरू आहे ती कोरोनाला पळवून लावण्यासाठी होते आहे का? तेवढेच नाही तर अशी दगडफेक करणाऱ्या, भाजपाची कार्यालये फोडणाऱ्या शिवसैनिकांची पाठ स्वतः उद्धव ठाकरेच थोपटत आहेत. सरकारच जर अशा गुंडगिरीला शाबासकीची थाप देत असेल तर मग सर्वसामान्यांनी कायदा सुव्यवस्थेवर विश्वास तरी कसा ठेवायचा?
शिवसेनेने आतापर्यंत सत्तेच्या बाहेर असताना सर्वांवर टीका करण्याचा आनंद लुटला. अगदी २०१४ला भाजपासोबत सत्तेत असतानाही आम्ही सरकारवर अंकुश ठेवतो म्हणत भाजपाला रोज लक्ष्य करण्याचे धोरण राबविले. तरीही ती टीका भाजपाने सहन केली. त्याला प्रत्युत्तर दिले नाही. मग आज आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना अशीच टीका शिवसेनेला का सहन होत नाही?
हे ही वाचा:
सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट
‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’
मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही
खरे तर, अशा टीकेची शिवसेनेला सवय नाही. आतापर्यंत विरोधी पक्षात राहून किंवा सत्तेत असतानाही विरोधकांना झोडपण्याची त्यांची पद्धत होती. प्रसारमाध्यमांचे टीआरपीही अशा टीकेमुळे गगनाला गवसणी घालत होते. पण आज नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मात्र हीच प्रसारमाध्यमे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याची भाषा करू लागली. कुठे चालला आहे महाराष्ट्र असे विचारत दुखवटा पाळला जाऊ लागला. पण गेल्या दीड वर्षात सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुख, संजय राठोड यांना द्यावा लागलेला राजीनामा, १०० कोटींची वसुली अशा एक ना अनेक प्रकरणांमुळे महाराष्ट्राची जी बदनामी झाली त्याचे काय? या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या कोणत्या संस्कृतीचा जयजयकार झाला?
पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. यावेळी आम्हीच महापालिका जिंकणार अशी घोषणा नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत केली. त्यामुळे शिवसेनेचा पारा चढणे स्वाभाविक आहे. कारण आज शिवसेनेचा जो काही डोलारा उभा आहे तो महानगरपालिकेच्या पायावरच आहे. गेल्या २५ वर्षांच्या महापालिकेतील सत्तेबाबत आता सर्वसामान्यांमधून रोखठोक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. महापालिका हातून जाईल की काय, अशी भीती वाटत असल्यामुळे राणे यांच्या वक्तव्याच्या आड लक्ष विचलित करण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. पण सर्वसामान्य जनता महाराष्ट्राच्या सन्मानाच्या, अस्मितेच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या या नाटकाला अजिबात भूलणार नाही.