काही महिन्यांपूर्वी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने घातलेल्या छाप्यांनंतर, ‘सोळाव्या शतकात तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले असतील पण मी एकविसाव्या शतकातील तानाजी मालुसरे आहे, धारातिर्थी पडणार नाही,’ अशी सिंहगर्जना करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अखेर परिस्थितीला शरण आले. आपल्याला राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासाची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना देऊन तातडीने भाजपाशी युती करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या, अशी एका पत्राद्वारे याचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सरनाईकांच्या मनातले सांगावे आणि पंतप्रधानांनी तातडीने युतीसाठी तयारीला लागावे इतके हे सोपे आहे, असे सरनाईकांना वाटले असावे. पण ही उपरती सरनाईकांना अचानक का झाली असावी? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
गेले काही दिवस सरनाईक हे राजकारणाच्या पटलावर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात आमदार कुठे गायब झालेत असे सवाल विचारले जाऊ लागले होते. काही महिन्यांपूर्वी ईडीची नोटीस बजावल्यावर ते दोन आठवडे गायब होते, त्यानंतर गेले काही दिवस पुन्हा एकदा ते दिसेनासे झाले. रविवारी त्यांचे पत्र सोशल मीडियावर पडले आणि सरनाईक पुन्हा प्रकट झाले. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना कशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कचाट्यात सापडली आहे, आता भाजपाशी जुळवून घ्या वगैरे सल्ला दिला खरा, पण तो मुद्दा केवळ एक दिखावा होता. मुख्य मुद्दा होता तो त्यांना होत असलेल्या त्रासाचा. ईडीने नोटीस बजावून त्यांच्या कार्यालयावर छापे मारल्यापासून ते अस्वस्थ असणार हे स्वाभाविकच होते.
खरे तर, सरनाईक यांना ही उपरती झाली आहे ती शिवसेनेच्या चिंतेपोटी नाही. आपल्या इतक्या वर्षांच्या राजकीय प्रवासात उभारलेले संपत्तीचे इमले आता ढासळतील की काय, या भीतीपोटी. ते टाळायचे असेल तर शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव त्यांना झाली असावी. गरिबीतून वर आलेले सरनाईक हे मुंबई ठाण्यातील कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स, जमिनी, रिअल इस्टेटचा व्यवसाय असा त्यांचा व्याप आहे. पत्नी, मुले नगरसेवक, व्यावसायिक आहेत. त्या अर्थाने सुरुवातीला प्राधान्यक्रम असलेले राजकारण आता त्यांच्यासाठी दुय्यमच असणार. हा व्यवसाय, त्यात मिळविलेली प्रतिष्ठा, संपत्ती याला कुठेही बाधा पोहोचू नये हाच त्यांचा प्रयत्न असणार. तो वाचविण्यासाठी सुरू असलेली धडपड म्हणजे हे पत्र.
हे ही वाचा:
मुलुंडमधील धक्कादायक प्रकार; मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या
मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली
१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या
यूपीएला बाजुला ठेवत राष्ट्रमंच नावाची तिसरी आघाडी
सहाएक महिन्यांपूर्वी कंगना रनौटशी झालेल्या वादामुळे प्रताप सरनाईक ऐन भरात होते. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी सगळी सूत्रेच जणू हाती घेतली होती. कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड शिवसेनेच्या महिला आघाडीकडून फोडले जाईल, अशा बाताही त्यांनी मारल्या. तिच्याविरुद्ध ट्विट युद्धही सरनाईक खेळले. कंगनावर हक्कभंगाची नोटीसही बजावून सरनाईक शिवसेनेचे सरसेनापती बनले. पण पुढे काय झाले? गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या घरावर धाडी पडल्या. त्यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही कुणाला भीत नाही. अटक करून दाखवा. तो आवेश नंतर कुठच्या कुठे पळून गेला. आज त्याच शिवसेनेने लवकरात लवकर मोदींशी जुळवून घ्यावे असे सांगण्याची वेळ प्रताप सरनाईकांवर आली आहे.
पत्रात ते म्हणतात की, भाजपामधील अनेकांशी शिवसेनेच्या नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते तुटू नयेत याची काळजी घ्यायला हवी. मग हे संबंध तेव्हा त्यांना का आठवले नाहीत? का नाही याच सरनाईक यांनी आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करत असताना त्यांना हा सवाल विचारला? तेव्हा त्यांना भाजपातील हेच जिव्हाळ्याचे लोक नजरेसमोरही नको होते. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवणारे हेच सरनाईक होते. तेव्हा भाजपामधील जिव्हाळा त्यांना दिसला नाही.
गेल्या दीड वर्षांत ज्या पद्धतीने शिवसेनेने भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, काँग्रेस, राष्ट्रवादीशी सत्तासोबत करता यावी यासाठी हिंदुत्वाची भूमिका बासनात गुंडाळून ठेवली, ती पाहता आता कोणत्या तोंडाने शिवसेनेने भाजपाशी युती करावी आणि झाले गेले विसरून जावे असे सरनाईक यांना वाटते? आता होत असलेल्या ईडी किंवा सीबीआयच्या कारवाईत नव्या कारवाईची भर पडण्याची शक्यता वाटू लागल्याने त्यांना आता युतीचा कळवळा आला आहे का? थोडक्यात, काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करून सत्तेचे लोणी मटकाविण्याची संधी मिळाल्यावर हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवायचे. आपले इप्सित साध्य झाल्यावर पुन्हा कोलांटउडी मारायची, हेच सरनाईक यांच्या पत्रातून स्पष्ट होते.
आपण जसे सोयीस्कर विचारधारा बदलतो तसे भाजपाही करील, असा विश्वास सरनाईक यांना वाटतो आहे. खरे तर, या पत्रामागे विचारधारेचा काडीमात्र संबंध नाही. विचार आहे तर तो फक्त आपल्या संपत्तीचा, व्यवसायाचा, आपल्या हितसंबंधांचा, आपल्या भविष्याचा. त्यासाठी दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न हाच सरनाईक यांच्या पत्राचा मतितार्थ आहे. पण भाजपा याला बधणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हिंग लावूनही आता विचारत नाहीत, विचारणारही नाहीत.