…वरळीमधील मराठी माणसांसाठी तो आनंदाचा क्षण!

…वरळीमधील मराठी माणसांसाठी तो आनंदाचा क्षण!

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे वक्तव्य

वरळी नायगाव, ना. म जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी जांबोरी मैदानात झाला होता. संपूर्ण आराखडा तयार करून त्यांच्या निविदा काढून कार्यादेश सुद्धा देण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एका प्रकल्पाच दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्यामुळे राज्यसरकार वेळकाढूपणा तर करत नाही ना ? असा सवाल करतानाच महाविकास आघाडी सरकारने आता विलंब न करता हा प्रकल्प गतीने व सांगितलेल्या वेळेत पूर्ण करावा. वरळी येथील मराठी माणसांना जेव्हा हक्काची घरं मिळतील तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आनंदाचा क्षण ठरेल, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना विचारलं असताना दरेकर म्हणाले, वरळी येथील रहिवाश्यांना लवकर हक्काची घरं मिळणार असेल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल.

मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पामध्ये जातीने लक्ष घालून सर्व परवानग्या मिळवल्या होत्या. प्रकल्पाच्या निविदा देण्यात आल्या होत्या, वर्कऑर्डर सुद्धा देण्यात आली होती. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रीतसर भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते. परंतु आज दीड वर्षानंतर विलंब करत परत आज त्याच प्रकल्पाच भूमिपुजन होत आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version