राणा दांपत्याच्या वकिलांचा युक्तिवाद
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सध्या न्यायालयात खटला सुरू असताना त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की, हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह होऊ शकतो का?
आबाद पोंडा यांनी राणा दांपत्याची बाजू मांडताना युक्तिवाद केला की, राणा दांपत्यच मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करणार होतं. त्यांच्यासोबत आणखी कुणीही तिथे जाणार नव्हते. उलट, हिंसा टाळण्यासाठी राणांनी कार्यकर्त्यांना न येण्याचं आवाहन केलं होतं.
पोंडा यांनी असाही युक्तिवाद मांडला की, राणा दांपत्य मातोश्रीवर गेलेच नाहीत. जी घटना घडलीच नाही त्यावर गुन्हा कसा नोंदविला? त्याठिकाणी कायदा सुव्यवस्था शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच बिघडविली. शिवाय, राणांनी सरकारविरोधात हिंसेचे आव्हान दिलेले नाही.
हे ही वाचा:
मविआ सरकार रझा अकादमीवर बंदी का घालत नाही?
ग्यानव्यापी मशिदीत व्हिडीओग्राफीला नकार; न्यायालयाचा अवमान?
पोंडा यांनी सांगितले की, लंडन ब्रिजवर चालिसा पठण केलं जातं तर मग मातोश्रीबाहेर पठण केल्यास गुन्हा कसला? राणा कोणत्या दुसऱ्या धार्मिक स्थळाच्या परिसरात चालिसा पठण करणार नव्हते. राणांनी घटनेच्या दिवशी दुपारी ३.४० वाजता चालिसा पठणाचा कार्यक्रमच रद्द केला होता, असेही पोंडा म्हणाले.
केवळ १४९ च्या नोटीशीचं पालन न केल्यामुळे १२४ म्हणजेच राजद्रोह हे कलम कसे लागू शकते, असेही पोंडा म्हणाले. राणा दांपत्याच्या जामिनावर ही सुनावणी सुरू आहे. हनुमान चालिसा मातोश्रीवर जाऊन म्हणणार, असा इशारा या दांपत्याने दिल्यानंतर राज्यात गदारोळ माजला. त्यांना खार येथील त्यांच्या घरातून बाहेरच पडू दिले नाही. शिवाय, शिवसैनिकांनी मातोश्री आणि राणा दांपत्याच्या घराबाहेर ठिय्या दिला होता.