बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

औरंगाबादच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब शेखला अटक का नाही केली? असा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला आहे. त्याबरोबरच औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे धडे देण्याची गरज असल्याचेही खंडपीठाने म्हटलं आहे.

ठाकरे सरकारच्या काळात, मंत्र्यांवर देखील अनेक आरोप झाले. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये माजी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा सरकारने घेतला. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा रेणू शर्मा प्रकरणात घेतला गेला नाही. याशिवाय राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा आरोप असताना आज तो पंढरपुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेच ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २ आठवड्यात बी समरी रिपोर्ट पीडितेला द्यावा. पीडितेने २ आठवड्यात आक्षेप नोंदवावा. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बी समरीवरील निर्णय गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश  दिले आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पीडितेन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

लॉकडाऊनची घोषणा आजच?

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील २९ वर्षीय तरुणीने केला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, “ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली होती. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणीला मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Exit mobile version